पोलादपूरात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

बाधित शेतकर्‍यांना केवळ नुकसान भरपाई नाही तर श्रमाचा मोबदलाही द्या

By Raigad Times    09-Nov-2023
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर । तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने कापणी होऊन शेतात उन्हामध्ये सुकायला ठेवलेले भात पिक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
 
या पार्श्वभुमीवर पोलादपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना केवळ भातशेतीची नुकसान भरपाई न देता राज्यसरकारने श्रमाचा मोबदलाही देण्याची गरज असल्याचे जनता दल सेक्युलरचे मुंबई प्रदेश कार्यालयप्रतिनिधी भगवान साळवी यांनी मत व्यक्त करून राज्यसरकारकडे याबाबत अधिकृत निवेदन देऊन मागणी करणार असल्याचे यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.
 
पोलादपूर तालुक्यात बुधवारी सकाळपासून सुर्योदय न झाल्याने वातावरणामध्ये कमालीचा उष्मा वाढला होता. दुपारी 1 वाजल्यानंतर आकाशात काळे ढग जमू लागले असताना तापमानही 38 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचून आर्द्रता कमी होऊन घामाच्या धारा निघू लागल्या.
 
पोलादपूर तालुक्यात भातशेती विमा काढलेल्या आणि न काढलेल्या शेतकर्‍यांची संख्या समसमान असून बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे भातशेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची आवश्यकता शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.
 
मात्र, शेतकर्‍यांनी केवळ भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी भरपाई घेण्यापेक्षा भातशेतीसाठी केलेल्या श्रमाचा मोबदला देखील शासनाकडून मागण्याची गरज असल्याचे यावेळी तालुक्यातील गोवेले येथील साळवीकोंडचे सुपुत्र तसेच जनता दल सेक्युलरचे मुंबई प्रदेश कार्यालयप्रतिनिधी भगवान साळवी यांनी स्पष्ट करून येत्या काही दिवसांमध्ये राज्यसरकारकडे लेखी निवेदन देऊन पक्षाकडून मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.