सुधागडात स्वस्त दरात कांदा विक्री खरेदीसाठी लोकांची झुंबड

29 Nov 2023 17:38:39
 pali
 
पाली /बेणसे । महाराष्ट्रात सर्वत्र कांद्याचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य माणसाला कांदा रडवत आहे. आज प्रत्येक भाजीमध्ये कांदा वापरला जातो. पण आता कांद्याचे भाव 70 रुपये किलो झाल्यामुळे लोकांना कांदे खाणे परवडत नाही असेच चित्र दिसून येत आहे. या भाववाढीमुळे कांदे खाणे लोकांनी बंद केले आहे.
 
या दरवाढीचा परिणाम सर्व सामान्य लोकांवर झालेला आहे हे पाहून, या परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा दक्षिण रायगड यांच्याकडून सुधागड तालुक्यातील पाली शहरात एस. बी.आय. बँक चौकाच्या समोरील मैदानात दहा रुपये किलोने कांदे विक्री चालू केली होती. यावेळी कांदे खरेदी करण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
शंभर ते दोनशे लोक रांगेत कांदा खरेदी करण्यासाठी उभे होते. प्रत्येक व्यक्तीला दहा रुपये किलोने पाच किलो कांदे तसेच दुकानात दीडशे रुपये किलोने विकली जाणारी तूरडाळ साठ रुपये किलो, चाळीस रुपये किलोचा आटा 27 रुपये 50 पैसे या दराने विक्री चालू होती.
 
स्वस्त दरात आवश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली यावेळी दिसून आली. सुधागड पेण मतदार संघाचे आमदार मा. आमदार रवीशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्या मार्गद्शनाखाली सुधागड तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्ते आलाप मेहता, भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, पाली नगरपंचायत उपनगराध्यक्ष आरिफभाई मणियार, उमेश मढवी आणि मडवी कंपनी तसेच इतर नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी या वस्तू देण्यासाठी मेहनत घेतली.
 यावेळी 400 ते 500 लोकांनी या जीवनावश्यक वस्तूंचा लाभ घेतला. यावेळी बहुसंख्य लोकांनी या उपक्रमाबाबत भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त केले.
 
Powered By Sangraha 9.0