भैरवनाथा, तुझं मंदिर कधी होणार देवा?

By Raigad Times    29-Nov-2023
Total Views |
shreewardhan
 
दिघी । श्रीवर्धन तालुक्यातील ’दिवेआगर’ हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ. याच ठिकाणी श्रीसिद्धनाथ भैरव व श्रीकेदारनाथ भैरव ही दोन मंदिर आहेत. या मंदिरांच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी बत्तीस लाखाचा निधी असून, अद्याप मंदिर बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे भैरवनाथा तुझं मंदिर कधी होणार ? अशी विचारणा भक्तांकडून केली जात आहे.
 
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण, पंचमुखी महादेव, उत्तरेश्वर पंचमुखी यांच्याप्रमाणे श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ या मंदिरांना देखील वैभवसंपन्न असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या मंदिराच्या नूतनीकरणाने कोकणातील विकासाला चालना मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
 
shreewardhan
 
मात्र, या कामाला या - त्या कारणाने चालढकलपणा होत असून, सोबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांच्या इच्छाशक्तिचा देखील अभाव असल्याने बांधकामाचा श्रीगणेशा झालाच नाही.येथील भैरवनाथाची यात्रा गावातील प्रमुख उत्सव आहे. त्यामुळे विशेषतः दोन दिवस भरणार्‍या वैशिष्ट्य पूर्ण यात्रेला गावकर्‍यांची व राज्यभरातील भाविकांची अलोट गर्दी असते.
  
जिल्हाभरात यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. भैरवनाथाची यात्रा देखील पुढील एप्रिल महिन्यात येत असल्याने मंदिरांच्या नूतनीकरणाला सुरुवात होऊन कामाला गती मिळावी आणि येणार्‍या यात्रे पर्यंत काम पूर्ण व्हावे. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. भैरवनाथाच्या मंदिरांची उत्सुकता पंचक्रोशीतील सर्वांनाच लागली आहे.