गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर धावणार आता इलेक्ट्रीक वॉटर टॅक्सी

By Raigad Times    27-Nov-2023
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई । गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीच्या मदतीने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. 200 प्रवाशी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी अल्पप्रतिसादामुळं कालांतराने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे.
 
मुंबई सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांच्यावतीने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे.
ई-वॉटर टॅक्सीमुळं एक तासांत गेट वे ते बेलापूरपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रिकवर चालणारी अशल्याने प्रदुषणालाही आळा बसणार आहे. हार्बर सर्व्हिस या खासगी संस्थेला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दैनंदिन जलवाहतूक सुरू होईल, अशी माहिती हार्बर सर्व्हिस कंपनीकडून देण्यात आली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने गेट वे आणि बेलापूर जेट्टीवरून ई वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज दहा फेर्‍या होतील. या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे.