वनविभाग क्षेत्रात झाडांची कत्तलीचे विदारक वास्तव

By Raigad Times    25-Nov-2023
Total Views |
mhasla
 
म्हसळा । शासन लोकांना सांगतो झाडे लावा, झाडे जगवा तुम्ही, वनविभाग सांगतो झाडे तोडण्यास परवाना देतो आम्ही म्हसळा वनविभाग क्षेत्रात झाडांची कत्तलीचे विदारक वास्तव दिसते आहे समोर.ग्लोबल वॉर्मिगच्या दुनियेत सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे.
 
आजच्या इंटरनेटच्या युगात श्वास घेत जगायचे असेल तर प्रत्येक नागरिकाचे झाडे लावा व ती जगवा हे कर्तव्य आहे.असे आवाहन सातत्याने शासन वेगवेगळ्या योजनांचे अनुदान खर्च करून बोंबलून, बोंबलून सांगतो आहे. शासन जसे सांगत आहे तसे ग्रामीण भागातील लोक वागत आहेत. कृती पण करीत आहेत मात्र वन विभाग मालकीच्या नावाने उघड्या डोळ्यांनी वृक्ष तोड करण्यास ठेकेदारांना परवाना देत असल्याचे विदारक वास्तव म्हसळा तालुक्यात पाहायला मिळत आहे.
 
म्हसळा वन विभाग क्षेत्रात मालकीच्या नावाने वनपाल व वनमजुर यांच्या निगराणीखाली मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या वृक्ष तोड करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टी भागात निसर्ग चक्री वादळ व तोक्ते वादळाने मोठा धुमाकूळ घातला होता त्याचा जास्त फटका श्रीवर्धन हरिहरेश्वर, दिवेआगर, म्हसळा तालुक्यातील जंगल उजाड होऊन माळरान झाल्याचे पहायला मिळाले. असे असतानाही वर्षा दोन वर्षात निसर्ग वनराई डोके वर काढत असतानाच त्याचेवर वन विभागाची वक्र दृष्टी पडली आहे.
 
निसर्ग चक्री वादळात मोडतोड झालेल्या झाडांचे वन विभाातर्फे विल्हेवाट लावली होतीच ती कमी पडली की काय लगेच म्हसळा तालुका वन विभाग खासगी ठेकेदारांना वृक्ष तोड करण्यास परवाना देवुन काय साध्य करायचे आहे असे नागरीकांचे म्हणणे आहे.वृक्ष तोड थांबवावी यासाठी आता पर्यावरणप्रेमींनी संघटीत होऊन म्हसळा तालुक्यातील भरमसाठ होत असलेली वृक्ष तोड थांबवावी अशी अपेक्षा सामान्य नागरिक जाहीरपणे बोलताना करीत आहेत. म्हसळा वनपरिक्षेत्र विभाग कार्यालय हे रोहा वनविभागाचे अधिपत्यात कार्यरत असताना त्यांची यंत्रणा कुठे आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.