नवीदिल्ली । अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे. बारामतीत दादा दादा दादा करत ज्यांचं आयुष्य गेलं. मग, अजित पवार यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं, असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली होती. याला सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.सुनील तटकरे म्हणाले, सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. शरद पवारांविरुद्ध कुठलीही अपात्रतेची याचिका दाखल केली नाही. कारण, शरद पवार हे आमचे दैवत आहेत.
अजित पवारांनी 30 वर्षे बारामती शहर उभे केले. दादा दादा दादा बोलत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही, असं सुनील तटकरेंनी म्हटलं.
83 वर्षांचे सतत बोलून किती केविलवाणी सहानभुती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहात? असा सवालही श्रीनिवास पाटलांवरून सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.