महाड । आगामी हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचे अधिवेशन आहे. 31 डिसेंबर ला खोके सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. सरकारला घेरण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद ही दोन महत्त्वाची आयुधे आहेत. विधान परिषदेतील बहुमत देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला कोकण पदवीधर मतदारसंघ जिंकायचा म्हणजे जिंकायचाच असे आवाहन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
आदित्य ठाकरे शुक्रवारी रायगड दौर्यावर होते. जिल्हा प्रमुख अनिल नवगणे आणि संपर्क प्रमुख संजय कदम यांनी त्यांचे रायगडात स्वागत केले. महाड, इंदापुर, नागोठणे यांठीकाणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यापुर्वी त्यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टिका केली. यावेळी माजी खासदार अनंत गीते, राजन साळवी, किशोर जैन, सुरेंद्र म्हात्रे तसेच अन्य नेते उपस्थित होते.
2024 साल हे आपलं आहे. लोकसभेत परिवर्तन घडवण्याची शपथ घेवून आपण निघालो आहोत. विधानसभेचे चित्र तर स्पष्ट आहे. महाविकास आघाडीचे सरकार जसे चालत होते तसेच सरकार आपल्याला आणायचे आहे. गद्दराना घ्यायचं नाही मात्र जे चांगले लोक आहेत त्यांना सोबत घेवू असेही ते म्हणाले.
एसपी आणि इतर पोस्टिंगसाठी शिदेंगटाचे आमदार पैसे मागत असल्याचा आरोप (रुमाल काखेत पकडण्याची अक्शन करत) केला आरोप. इकडे एम पी एस सी केलेल्या उमेदवारांना पोस्टिंग मिळत नाही त्यासाठी आंदोलने करावी लागतात दुसरी कडे त्यासाठी पैसे द्यावे लागतात जिथे पोस्टिंग साठी पैसे द्यावे लागत असतील, मागितले जात असतील तर हे सरकार काय करायचं आहे ?असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
वर्ल्ड कप ची मॅच मुंबईला असती तर आपण जिंकलो असतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण अनेक एम ओ यू केले. पण हे उद्योग आता गेले कुठे ? वेदांता चा प्रकल्प कुठं गेला ? टाटा एअर बस प्रकल्प कुठं गेला ? वर्ल्ड कप मॅच कुठे गेली असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.
निवडणुका लढा, जिंका आणि सरकार बनवा; पण घटनाबाह्य व संविधानाच्या विरोधात जाऊन सरकार जप्त व काबीज करणे म्हणजे अतिक्रमण होय. त्यामुळे राज्यातील आत्ताचे सरकार बाद होणे गरजेचे आहे. या सरकारने महाराष्ट्रात जे काही केले ते म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचे, प्रतिपादन युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
राज्यात घाबरट सरकार राज्यकर्ते म्हणून काम करत आहेत. निवडणुका घेण्याचे ते टाळत असले तरी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच विजय प्राप्त करेल व राज्यात पुन्हा एकदा बदल दिसेल, असा विश्वासही श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील खोके सरकार हे लोकशाहीचा खून करून तयार झालेले आहे. त्यामुळे संविधानाचा आणि घटनेचा विचार करता हे सरकार बाद होणे गरजेचे आहे. मुळात विरोधकांनी निवडणुका लढाव्यात, जिंकाव्यात आणि सरकार बसवावे. मात्र, लोकशाहीचा गळा घोटून सरकार जप्त व काबीज करणे म्हणजे अतिक्रमण होय. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रते संदर्भातील सुनावणीबाबत 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यावेळी निश्चितच हे सरकार बाद होईल.’
ते पुढे म्हणाले, ‘राज्यात आज सगळीकडे प्रशासक पाहायला मिळत आहेत.
निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरत आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीही या सरकारने रद्द केली. असे हे घाबरट सरकार राज्यकर्ते म्हणून काम करत आहेत. मला त्यांचे काम म्हणजे घाणेरडे राजकारणात करण्यात गेले आहे. आज जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून येणार्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा निश्चितच बदल दिसेल आणि राज्यात महाविकास आघाडी पुन्हा एकदा निश्चितच जिंकेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.