बाल्हे हंडेवाडी येथील जलजीवन योजनेचे काम ठप्प

24 Nov 2023 16:14:45
 roha
 
रोहा । रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली तर्फे आतोणे हद्दीतील बाल्हे- हंडेवाडी येथे जल जीवन मिशन योजने अंतर्गत काम मागील 11 महिन्यापासून ठप्प आहे. परिणामी स्थानिक नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. सदर योजनेचे काम तातडीने मार्गी न लागल्यास संतप्त ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयावर रिकामा हंडा मोर्चा काढणार असा इशारा वजा निवेदन भाजपाचे नेते रवींद्र काशिनाथ तारू यांनी दिला आहे.
 
दरम्यान या भागातील गंभीर पाणी समस्या विषयी रवींद्र काशिनाथ तारू यांनी पंचायत समितीतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला निवेदन देत तातडीने बंद पडलेले काम सुरु करण्याची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात अनेक जलजीवन मिशन योजनेची कामे चालू झालेली आहेत.
 
मात्र रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील बाल्हे व हांडेवाडी येथील गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप ठप्प आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणी समस्याला तोंड द्यावं लागला आहे. ठेकेदार काम चालू करत नाही. असे असताना संबधित खात्यातील अधिकारी मूग गिळून बसले आहेत असा आरोप जनतेतून होत आहे. या गांवातील पाणी योजनेच्या कामाला दि. 19 जून 2022 रोजी तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
 
या गजराज कंट्रक्शन या एजन्सीला या कामाचा ठेका 6 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आले होते. संबधित ठेकेदाराने मात्र मागील वर्षभर काम बंद ठेवल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या बाबत भाजपचे स्थानिक नेते रवींद्र काशिनाथ तारू यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. रोहा पंचायत समितीतील पाणी पुरवठा विभागाने गावकर्‍यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता त्वरित पाणी योजनेचे काम चालू करून द्यावे जेणेकरून नागरिकांचे हाल दूर होतील मागणी रवींद्र तारू यांनी केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0