सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ; राज्य शासनाचा निर्णय

By Raigad Times    24-Nov-2023
Total Views |
 mumbai
 
मुंबई । राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 42 टक्क्यावरुन आता 46 टक्के करण्यात आला आहे. एक जुलै 2023 पासुनची महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.
 
मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी 30 जून 2023 रोजी राज्य सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती.
 
दिनांक 1 जुलै, 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 42 % वरुन 46 % करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै, 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर, च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहेत.