सुरगडावर अडकलेल्या अमेरिकेचे नागरिकाची सुटका

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी कड्यावरून क्लायंबिंग च्या साह्याने सुखरूप उतरविले

By Raigad Times    23-Nov-2023
Total Views |
roha
 
रोहा । मुंबई गोवा महामार्गावर रोहा तालुक्यातील वैजनाथ गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर अडकलेल्या अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी कड्यावरून क्लायंबिंग च्या साह्याने त्यांना सुखरूप खाली उतरविले.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी की संजय साळुंखे (वय 60) हे खांब गावातील रहिवासी असून सध्या अमेरिकेचे नागरिकत्व त्यांनी स्वीकारले आहे. मागील काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या डाव्या पायाला प्रचंड इजा झाली असून डावा पाय कमकुवत आहे. ते आपल्या मुळ गावी खांब इथे आले असता वैजनाथ गावाजवळ असलेल्या सुरगडाचा थाट अभ्यासण्यासाठी भटकंती करत सुरगडावर गेले.
 
गड न्याहाळून परतीचा प्रवास करत असतांना उंच कड्यावरून उतरण्यास त्यांचे मन धजावत नव्हते त्यांना भीती वाटत होती. अशा प्रसंगी त्यांनी माणगाव तालुक्यातील आपल्या जिवलग मित्राला घटनेची माहिती दिली. त्यांच्या मित्राने आपत्ती बचावासाठी नावाजलेले महेश सानप यांना घटनेची माहिती दिली.
 
मात्र महेश सानप सर कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्याने रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत असणार्‍या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांना त्यांनी संपर्क साधला. संस्थेच्या सर्व सदस्यांनी मूळ घटनास्थळी धाव घेतली. आणि संजय साळुंखे यांना कड्यावरून क्लायंबिग च्या साह्याने सुखरूपरित्या खाली उतरवले. साळुंखे यांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड चे आभार मानले.