मराठयांनो एकजुट रहा, आरक्षण द्यावेच लागेल-मनोज जरांगे पाटील

By Raigad Times    20-Nov-2023
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर । मराठा समाजाने एकजूट ठेवल्यास आरक्षण द्यावेच लागेल. चार पिढयांपासून वंचित ठेवले; आता कुणबी नोंदी आढळून येऊ लागल्या आहेत. आपली लेकरं 95 टक्के मिळवूनही 45 टक्केवाले पुढे गेलेत. आता यापुढे असा अन्याय होऊ देणार नाही. आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे, असा आत्मविश्वास मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा जनसमुदायाला दिला.
 
मनोज जरांगे पाटील यांचे प्रतापगड येथे दर्शनाहून आल्यानंतर कोकणातील रायगड जिल्ह्यात प्रवेश करताच पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील मराठा समाजबांधवांतर्फे ज्ञानेश्वर सकपाळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांचा सत्कार केल्यानंतर जरांगे-पाटील यांनी कापडे कामथे रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करून पोलादपूरकडे मार्गक्रमण केले.
 
रायगड जिल्ह्यात पोलादपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ 101 मशालींसोबत मराठा समाजबांधवांकडून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठाकडे जाण्यापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील सर्व्हिसरोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केले.
 
यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे, सुरेश मोरे, वैभव चांदे, लक्ष्मण मोरे, रामदास कळंबे, भाई साबळे, रामचंद्रदादा साळुंखे व अन्य स्थानिक कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मनोज जरांगे पाटील यांचा अध्यक्ष सुनील मोरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.