खानाव ग्रामपंचायतीत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे अजय नाईक सरपंचपदी विराजमान

By Raigad Times    20-Nov-2023
Total Views |
 alibag
 
कोर्लई । अलिबाग तालुक्यातील खानांव ग्रामपंचायतीत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे अजय नाईक सरपंचपदी विराजमान झाले तर उपसरपंचपदी निलेश गायकर यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यातील शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांचा प्रभाव असलेल्या खानांव ग्रामपंचायतीत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे मुख्य प्रवर्तक निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतांनी निवडून आले.
 
दि.17 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या झालेल्या सभेत उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे निलेश गायकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
 
त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी अध्यासी अधिकारी तथा सरपंच अजय नाईक, ग्रामसेवक तथा सचिव सुदेश राऊत यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य विशाखा गायकर, सज्जला शिंदे, निधी पाटील, मनीषा म्हात्रे, सुचिता म्हात्रे, युक्ता गुजर, संदेश पडवळ आदी सदस्यांसह ग्रामविकास परिवर्तन पॅनलला समर्थन देणारे उपस्थितीत युवावर्ग, महिला, मान्यवर ग्रामस्थांनी नवनिर्वाचितांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.