अलिबाग । रायगड जिल्ह्यात कुणबी नोंदीचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून आतापर्यंत 39 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. विविध सरकारी विभागांमधील 17 लाख पाने तपासण्यात आली आहेत. मात्र किती नोंदी मराठा कुणबी आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.
मराठा आरक्षणासंदर्भात कागदपत्री पुरावे जिल्हयातील नागरिकांना सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
शासन निर्णयान्वये शासनाचे विविध विभागामार्फत जातप्रमाणपत्र वितरित करण्याकरीता पुरावे संकलीत करणेचे काम प्रगतीपथावर आहे. त्याअनुषगाने जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्वीकारण्यात येणार आहेत.
जिल्हयातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्विकारण्याची येणार आहेत. उपलब्ध पुरावे स्थानिक तहसिलस्तरावरील स्थापित विशेष कक्षात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत.
उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार हे नोडल अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
तहसीलदार उमाकांत कडनोर सहाय्यक नोडल अधिकारी, तीन नायब तहसीलदार व पाच लिपीक असे दहा जण कार्यरत आहेत. तसेच, तालुका स्तवरावरदेखील कक्ष उभारण्यात आले असून तहसीलदार नोडल अधिकारी आहेत.जिल्ह्यात शिक्षण विभागासह, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा कारागृह यामधील मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु करण्यात आले आहे.
सुमारे 17 लाख पानांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 39 हजार कुणबींचे पुरावे सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मराठा कुणबी, कुणबी मराठा एक टक्का व फक्त कुणबी यांची नोंद साधारणतः 99 टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.
शिक्षण विभागात शोध मोहिम
कुणबी दाखले व मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कामाला लागले आहेत. आतापर्यंत पाच हजारच्यावर कुणबी मराठा व मराठा कुणबीच्या 156 नोंदी सापडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 1967 पूर्वी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदी शोधण्याचे काम गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांनी सुरु केले आहे.
नोंदी शोधताना सुरु आहे तारेवरची कसरत
जिल्ह्यातील शाळांमध्ये शंभर वर्ष जुनी रजिस्टर्स आहेत. या रजिस्टरमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी याची नोंद शोधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीर्ण झालेल्या रजिस्टरमधून पानगळून पडण्याचीदेखील भीती अधिक आहे. त्यामुळे नोंदी शोधताना मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत.