बेडीसगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी लाल रंगाच्या स्थानिक वाळूचा वापर

By Raigad Times    18-Nov-2023
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत मधील बेडीसगाव येथील शाळेच्या वाडी मधील रस्त्याच्या कामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर आहे. त्या निधीमधून बनविण्यात येत असलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामासाठी चक्क लाल माती सारखी वाळू आणण्यात आली आहे.
 
दरम्यान, दहा लक्ष रुपये खर्चून बनविल्या जात असलेल्या रस्त्याच्या कामासाठी स्थानिक नदीमधील पावसाळयात काढण्यात आलेली लाल रंगाची माती सारखी वाळू आणण्यात आली आहे. दरम्यान, त्या लाल रंगाच्या स्थानिक वाळू वापरण्यास स्थानिकांनी विरोध केला असून जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याबद्दल कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थानाचे लक्ष लागून राहिले आहे.
 
बेडीसगाव मध्ये सात वेगवेगळ्या भागात आदिवासीपाडे असून त्या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे बांधकाम मंजूर झाले आहे. 200 मीटर लांबीचा रस्ता बनविण्यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर असून त्या निधी मधून बेडीसगाव मधील शाळेच्या वाडी मधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे.
 
त्यासाठी 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी खडी पसरविण्यात आली असून त्यावर काँक्रीटीकरण करण्यासाठी वाळू आणि सिमेंट देखील आणण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे बांधकाम चांगले आणि पुढील काही वर्षे टिकावू व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थ देखील रस्त्याच्या कामाकडे लक्ष ठेवून आहेत.
 
मात्र रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आलेली वाळू पाहून सर्वांना धक्का बसला असून पावसाळयात डोंगरातून वाहून येणारी वाळू बाहेर काढून ठेवली जाते. ती वाळू या रस्त्याच्या कामासाठी संबंधित कामाच्या ठेकेदाराने आणली आहे. पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून आलेली लाल माती सारखी वाळू आणण्यात आल्याने ग्रामस्थांना संतप्त झाले आहेत.
 
शासनाच्या 25/15 मधून त्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर आहे.त्यामुळे एवढे पैसे खर्च करून बनविण्यात येणार्‍या रस्त्याचे बांधकाम चांगले व्हावे यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थ मंगळ निरगुडा यांनी त्या लाला मातीसारख्या वाळू बद्दल थेट जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता खिलारे यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली आहे. त्यावर बांधकाम विभागाचे उपअभियंता भिलारे यांनी कोणतीही प्रतिकृतीय दिली नाही असे देखील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.