राज्यात पुढील आठवड्यात वाढणार थंडीचा जोर

By Raigad Times    18-Nov-2023
Total Views |
 pune
 
पुणे । राज्यात आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीनं होणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी हे चित्र कायम राहणार आहे. उत्तर भारतामध्ये पश्चिमि झंझावातामुळं हिमालयीन क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे हवामानाचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येत आहेत.
 
राज्यात थंडीचा कडाका वाढत असला तरीही मुंबई परिसरात मात्र पहाटेचे काही तास वगळता थंडीचा लवलेषही पाहायला मिळणार नाही. कमाल तापमान 36 अंशांदरम्यान राहणार असल्यामुळं हा दाह कमी होण्याचं चित्र तूर्तास दिसत नाही. कोकण पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण कायम असणार आहे. पण, पहाटेच्या वेळी मात्र इथंही वातावरणात गारवा जाणवेल.
 
खासगी हवामान संस्था ’स्कायमेट’च्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये बांगलादेशच्या दक्षिण किनार्‍यापासून दक्षिण पूर्व बंगालपर्यंत बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तिथं तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टी भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असून, देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्येही पावसाचा शिडकावा होऊ शकतो. हिमाचल प्रदेशातील डोंगराळ क्षेत्रांवरही शुभ्र बर्फाची चादर पाहायला मिळू शकते. थोडक्यात देशभरात तुलनेनं पावसापेक्षा सध्या थंडीचं पारडं जड दिसत आहे.