कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मागणीला यश

अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

By Raigad Times    18-Nov-2023
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील भातशेतीचे आठ ते दहा नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.शेतीमधील पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी कर्जत तालुका शिव सहकार सेनेने आणि काही शेतकर्‍यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे केले होते.स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील या नुकसानीबद्दल शासनाकडे पंचनामे करून शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी अशी मागणी केली होती.
 
दरम्यान, कर्जत तहसील क्षेत्रातील भाताच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे लेखी निर्देश राज्य सरकारचे वतीने तहसीलदार डॉ शीतल रसाळ यांनी कृषी, महसूल आणि ग्रामपंचायत विभागाला दिले आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांचे भातकापणी जोमात असताना आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली.
 
त्यानंतर नऊ आणि दहा नोव्हेंबर रोजी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान केले. त्यावेळी बहुसंख्य शेतकर्‍यांच्या शेतात भाताचे पीक उभे होते, तर काही शेतकर्‍यांचे भाताची रोपे कापून सुकत ठेवलेली असताना भाताच्या शेत अवकाळी पावसाने पाण्याने भरून गेली होती.
 
या अवकाळी पावसाने भाताच्या पिकाचे मोठे नुकसान केले असून 10 नोव्हेंबर रोजी कर्जत तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी कर्जत तहसील कार्यालय जाऊन तहसीलदार डॉ शीतल रसाळ यांची भेट घेऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. शिवसेना प्रणित सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील, कर्जत तालुका अध्यक्ष दशरथ मुने तसेच शेतकरी दत्तात्रय देशमुख,संतोष विचारे यांनी शेतकर्‍यांच्या वतीने निवेदन दिले होते.
 
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच राज्य सरकारकडे संपर्क साधून कर्जत तालुक्यातील नुकसानीची माहिती देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून आदेश निघाल्याने कर्जत तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसानी झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी लेखी आदेश तहसीलदार यांच्याकडून पारित झाले आहेत.
 
शासनाचे प्रतिनिधी म्हणून नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत असे आदेश कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांना देण्यात आले आहेत.आता कर्जत कृषी विभाग मधील सर्व कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षक यांच्यासह कर्जत पंचायत समिती मधील सर्व ग्रामसेवक आणि महसूल विभागाचे सर्व तलाठी यांच्या माध्यमातुन अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जात आहेत.