मुंबई । भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने केंद्र शासनाकडून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्घाटन 15 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुंटी (राज्य-झारखंड) येथे जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
या मोहिमेत देशातील खतनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायज़र्स लिमिटेड सह विविध खत उत्पादक कंपन्या सहभागी आहेत. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे नॅनो यूरिया, नॅनो डीएपी आणि अन्य सूक्ष्म पोषक खतांची फवारणी प्रात्यक्षिकाबरोबर रासायनिक खतांचा अनावश्यक दुरुपयोग टाळून मातीचे योग्य आरोग्य राखण्यासाठी खतांचा संतुलित वापर यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे.
आरसीएफ़च्यावतीने यासंबंधी शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व शेतकर्यांसाठी मृदा परिक्षण, कृषी प्रदर्शन व मेळावे, पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम नेहमी राबवले जातात.ही मोहीम भारत सरकार अंतर्गत येणार्या विविध मंत्रालयांमार्फत राबविण्यात येत असून माहिती व प्रसारण मंत्रालय, कृषी मंत्रालय व उर्वरक विभाग यांच्या विशेष सहभागातून होत आहे.
सदर मोहिमेचा उद्देश हा केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणार्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविणे हा आहे.या उपक्रमाची सुरुवात भारतातील सर्व आदिवासी जिल्ह्यांतून करण्यात आली असून 24 जानेवारी, 2024 पर्यंत हा उपक्रम देशभर राबविला जाणार आहे.