सोगाव । अलिबाग तालुक्यातील प्रमुख महामार्गांपैकी एक मार्ग असलेल्या कनकेश्वरफाटा ते कार्लेखिंड महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत, यामुळे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यामार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी केला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे व वाढलेले गवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामार्फत पावसानंतर काढण्यात येते, परंतु पावसाळा संपून बरेच दिवस झाले आहेत, तसेच ही वाढलेली झाडेझुडपे वळणाच्या ठिकाणी रस्त्यावर आल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत, सुदैवाने अजूनपर्यंत तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अपघात मात्र वारंवार होत आहेत.
या रस्ते मार्गाने कनकेश्वर मंदिर, किहिम बीच, आवास-सासवणे बीच, मांडवा बीच आदी पर्यटनस्थळ ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात, तसेच याच मार्गाने जगातील दुसर्या क्रमांकाचा आर.सी.एफ. थळ कारखान्याकडे जाता येते, त्यामुळे नेहमी या कारखान्यात येणार्या अवजड व ज्वलंत ज्वालाग्राही वाहने या मार्गावरून जात असतात, नुकतेच काही दिवसांपूर्वी परहूरपाडा येथील शाळेजवळील वळणावर ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा वाहनाचा अपघात झाला होता,सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी ह्या मार्गावर वाढलेली झाडेझुडपे व गवत काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे.?असा सवाल यामार्गावर प्रवास करणार्या वाहनचालकांनी व इतर प्रवाशांनी उपस्थित केला आहे.