चिल्हार नदीमध्ये तरुणाचा बुडून मृत्यु

By Raigad Times    17-Nov-2023
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील चील्हार नदीमध्ये एका आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू झाला.दारू पिण्यासाठी नदीवर एकत्र गेलेले पाच तरुण दारूच्या नशेत नदीच्या पाण्यात पोहू लागले आणि त्या ठिकाणी पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
दरम्यान, या बाबत कर्जत पोलीस तपास करीत असून हा घातपात आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. साळोख ग्रामपंचायत मधील खोंडेवाडीत राहाणारा व्यक्ती पाण्यात बुडून मृत्यू झाला असून यशवंत दुंदा हेले असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
शेतातील भात झोडणीचे काम पूर्ण झाले म्हणून दुपारी यशवंत व त्याचे मित्र असे एकूण पाच जण गावाला लागून वाहणार्‍या चिल्हार नदीवर पार्टी करण्यासाठी म्हणून बसले होते. सोबत आणलेली दारू पिऊन ते सर्व पाच जण नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी म्हणून उतरले.
 
दारूच्या नशेत शुद्ध हरवून बसलेले यशवंत व त्याचे मित्र काहीवेळ पाण्यात मोजमजा करीत राहिले.साधारण पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास निघून घरी गेल्यावर मित्रांपैकी एका मित्राला आठवण झाली आणि त्यानंतर यशवंत आपल्या सोबत पाण्या बाहेर आलाच नाही याची आठवण झाली.
 
त्यानंतर ते चौघे पुन्हा यशवंत हेळे या मित्राला शोधण्यासाठी पुन्हा नदीवर पोहचले होते. मात्र अंधार झाल्याने यशवंत नदीच्या पात्रात दिसून आला नाही. गावातील ग्रामस्थ देखील त्याला शोधण्यासाठी नदीवर पोहचले होते. मात्र यशवंत काही आढळून आला नाही शेवटी स्थानिक ग्रामस्थांनी यशवंत हरवला असल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कशेळे आऊट पोस्ट पोलीस ठाण्यात जावून दिली.
 
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी जावून यशवंत हेले चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा एकदा कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांना यशवंत हेले याचा मृतदेह पाण्यात दिसून आला.पाण्यात बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर मृतदेह पाण्यात सापडला होता.
 
ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी यशवंतचा मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेह काशेले येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेला. दरम्यान, ज्या ठिकाणी ते सर्व तरुण पोहण्यासाठी गेले होते, आणि ज्या ठिकाणी यशवंत बुडाला त्या ठिकाणी नदी पात्रात पाण्याचा साठा कमी होता.
 
यशवंत हा पट्टीचा पोहणारा असल्याचे ग्रामस्थ सांगत असून चांगला तरुण पाण्यात बुडतो कसा?असा प्रश्न उपस्थित होत आहे. यशवंत यांच्या मृत्यू बद्दल ग्रामस्थांनी आणि त्याच्या नातेवाईक यांनी संशय व्यक्त केला असून कर्जत पोलिसांनी यशवंत सोबत नदीवर पोहायला गेलेल्या चार मित्रांना ताब्यात घेतले आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कशेळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी थोरणे आणि राठोड हे तपास करीत आहेत.