कोर्लई । गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सिकई खेळात वेदांत सुर्वेने महाराष्ट्राचे नेतृत्व करत - 62 किलो वजन गटात कांस्य पदक पटकावून रायगड जिल्ह्याचे नाव राखले. नेशनल गेम्स स्पर्धा -2023 दि. 26 आक्टोंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे संपन्न झाला.
43 खेळ आणि दहा हजारांहून अधिक खेळाडूंचा समावेश असलेल्या या राष्ट्रीय खेळाचा महाकुंभ ठरलेल्या स्पर्धेत सिंकई मार्शल आर्ट मध्ये महाराष्ट्राचे संघाने 2 सुवर्ण, 2 रजत व 4 कांस्यपदक मिळविले. तर रायगड च्या वेदांत सुर्वेने पुरुषांच्या - 62 किलो वजन गटात चुरशीच्या लढतीत कांस्य पदक पटकावले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निर्देशानुसार, सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मजहर खान व महासचिव रविंद्र गायकी यांनी खेळाडूंची निवड केली.त्यात संघ व्यवस्थापक दिनेश राऊत, अनुभवी प्रशिक्षक विजय चंद्रकांत तांबडकर व महिला प्रशिक्षक निलोफर खान यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेल्या महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी केली.
रत्नागिरीच्या डॉ. योगिता खाडे व पुण्यातील शिवराज वरघडे चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. तर नागपूरच्या आस्था रविंद्र गायकी व अहमदनगरच्या वैशाली बांगरने उत्तम लढत देत रजत पदकाची कमाई केली. तसेच वेदांत संदेश सुर्वे (रायगड), हुजैफा ठाकूर (रत्नागिरी), अश्विनी वागज (सोलापूर), बरोबरच मिक्स एरो सिंकई गटात अमन खान (नागपूर), सानिया चौव्हान (नागपूर), मेहबूब अन्सारी (नागपूर) हे खेळाडू महाराष्ट्रासाठी कांस्य पदक मिळवणारे मानकरी ठरले. सर्व स्तरावरून त्याचा या कामगिरीसाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.