सुधागड -पाली । सुधागड तालुक्यातील पाली हे ठिकाण अष्टविनायक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाली शहरात अवैध मटका जुगार धंदे सुरू झाले आहे. या अवैध मटका जुगार धंद्यांमुळे अनेक संस्कारांची राखरांगोळी झाली आहे.
गेल्या काही वर्षांत कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेकांचा कल नव्याने वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अशा धंद्याकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले आहे.
यामुळे आता पाली शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनीच नाहरकत दिली की काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. अवैध मटका जुगार धंद्यांवर दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेने उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. मटका, जुगारात तरुणांना सव्वा रुपयात शंभर रुपये मिळवता येत आहेत.
क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडले जात आहे, मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणार्यांची संख्या वाढत आहे. त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडेही वळत आहे. या अवैध धंद्याच्या नादी लागून कित्येक तरुण दिवसभर आकडेमोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात.
या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत, तरीही या धंद्याच्या नादी लागणार्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालवण्यात येतात. त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे असते.