पनवेल । पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असणार्या सिडको निर्मित करंजाडे वसाहतीमध्ये एन दिवाळीच्या सणात तीव्र पाणीटंचाई मुळे येथील नागरिकांची दिवाळी कोरडीच असल्याचा संताप येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. सिडको व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अपुर्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना हजारो रुपये मोजून टँकर विकत घ्यावे लागत आहेत.
सिडको ने फक्त घरांची निर्मिती केली मात्र पाणी मुबलक प्रमाणात देऊ न शकल्याने येथील रहिवाशांनी घर घेऊन घोडचूक केल्याचा संतापही सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुजर यांनी व्यक्त केला आहे.सिडको ने वसवलेल्या करंजाडे वसाहतीमध्ये हजारो घरांची निर्मिती केली.
मात्र या घरांना मुबलक मिळेल असे पाण्याची व्यवस्था काही केली गेली नाही. अपुर्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा प्रकार हा गेले दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे .वसाहतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी येथील नागरिक ही अनेक वेळा रस्त्यावर उतरले आहेत. मोर्चे, निवेदने, धरणे, आंदोलन करूनही प्रशासनाला काही जाग येत नाही.
पनवेल पेक्षा थोड्या कमी दरात या वसाहतीत घरे मिळाल्याने मुंबई स्थित असलेल्या नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण केले. मात्र घर घेऊन अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे आपण घोडचूक केली असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत. घरात जर पाणीच पुरेसे नसेल तर त्या घरात राहून उपयोग काय असा संत सवाल ही महिला वर्ग उपस्थित करीत आहेत .
नागरिकांना पिण्याचे पाण्याचा स्त्रोत अन्य कोणताही नसल्याने येथे विकतच पाणी घ्यावे लागते. टँकरलाही हजारो रुपये मोजावे लागतात. काही वेळेस तेही मिळत नसल्याने नागरिकांची ससे होलोपट होत आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुजर यांनी शासन दरबारी लेखी पत्राद्वारे निवेदन घेऊन जनतेमधील आक्रोश व्यक्त केला आहे.
जर वसाहती मधील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा झाला नाही तर येथील रहिवाशांचा संताप हा उद्रेकात होण्यास वेळ लागणार नाही यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर या वसाहतीला मुबलक पुरेसे पाणी मिळेल याची दक्षता घेण्याची मागणी चंद्रकांत गुजर यांनी केली आहे.