बोर्ली-मांडला । मुरूड तालुक्यात बुधवारी दुपार नंतर आलेल्या अवकाळी पावसाने कापणी केलेल्या भात शेतीला धोका होण्याची दाट शक्यता असून शेतकरी राजा धास्तावला आहे.
भारतीय हवामान विभाग मुंबई यांनी दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या इशार्यानुसार, पुढील तीन ते चार तासांत पुणे, रायगड जिल्ह्याच्या काही भागांत ढगांचा गडगडाट, वादळी वार्यासह हलका-मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून यावेळी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने देण्यात आला होता.
मुरूड परिसरात बुधवारी दुपारी अचानक आकाशात काळोख दाटून येऊन वारे देखील वाहू लागले. खारआंबोली, शिघ्रे, वाणदे पंचक्रोशीत अवकाळी पाऊस पडल्याने नुकतीच कापण्यात आलेली भात शेती भिजली असल्याचे शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले. दुपारी वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने भीतीचे वातावरण दिसून आले. मुरूड शहरात देखील पाऊस पडला, वारे देखील वाहत होते.
ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम आटोपल्याने अनेक शेतकर्यांनी तयार झालेली भात शेती मंगळवार पासून कापुन पीक शेतात ठेवले आहे.अचानक आलेल्या पावसाने मात्र शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पुढील दिवसात आधिक पाऊस पडल्यास कापलेल्या भातास कोंब फुटू शकतात अशी माहिती तुकाराम पाटील आणि रघुनाथ माळी यांनी बुधवारी सायंकाळी बोलताना दिली. पावसाचा कोणताच इशारा नसल्याने बळीराजा निर्धास्त होता.
बदलत्या वातावरणात पाऊस कधीही कोसळू शकतो अशी खात्री बळीराजाला झाली असली तरी पुढे पीक किती हाताशी लागेल याबाबत सांशक असल्याचे काही शेतकर्यांनी सांगितले. पाऊस आल्याने हवेत मात्र लगेच गारवा आला. रायगडच्या विविध भागात पाऊस पडल्याचे वृत्त आहे.