हा आरक्षणाचा प्रश्न आहे, धिंगाणा घालण्याचा नाही!अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, मनोज जरांगे-पाटील यांचा इशार

By Raigad Times    31-Oct-2023
Total Views |
 sarati
 
सराटी । हा गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. धिंगाणा घालण्याचा नाही. जाळपोळीला माझं समर्थन नाही, अशा शब्दांत जरांगे-पाटलांनी आंदोलकांना खडसावलं आहे. हे कोण करतेय, ही शंका येत आहे. उद्यापर्यंत जाळपोळ केल्याची माहिती
माझ्यापर्यंत येऊ नये. अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचं आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांना आग लावण्यात आली होती. त्यानंतर आमदार संदीप क्षिरसागर घराला तर जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावल्याच्या घटना समोर येत आहेत.
 
जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. साखळी आणि आमरण उपोषण करा, असं मराठा समाजाला सांगितलं होतं. करोडोच्या संख्येने मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जाळपोळ आणि उद्रेक करू नका, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं आहे.
 
सत्ताधारी पक्षातील लोकच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरे जाळत आहेत. आणि शांततेच्या मराठा आंदोलनाला डाग लावण्याचा आणि चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे. उद्रेक करण्याची काहाही गरज नाही. उद्रेक न करताही मराठा आरक्षण मिळवता येते. तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येईल.
 
आपल्या दारात कुठल्याही राजकीय नेत्यानं यायचं नाही. मग, आपण नेत्याच्या दारात कशासाठी चाललो आहे? असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला.