श्रीवर्धन : आम्ही कधीही शरद पवारसाहेब यांच्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही; परंतु पवार साहेब विनंती आहे, नको त्या लोकांच्या डोक्यावर हात ठेऊ नका. भलत्या सलत्या लोकांना, बेईमान लोकांना मोठे करु नका, असा टोला आ. जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना नाव न घेता लगावला.
ते आज (२७ ऑक्टोबर) श्रीवर्धन येथे रायगड जिल्हा बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते. आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, श्रीवर्धन कोणाचे? असा प्रश्न आज पत्रकार अनेकदा विचारतात. मात्र श्रीवर्धन हे केवळ बॅ. अंतुले साहेबांचे आहे. त्यांनी येथे विकास आणला. पूर्वी श्रीवधनमध्ये धुळीने माखलेले रस्ते होते. मुंबईला जाताना येथील लोक वडखळला एका हॉटेलमध्ये कपडे बदलायचे आणि पुढे जायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
शिवसेना खासदार अनंत गीते आज देखील आजी खासदार असते; परंतु आमच्याकडून मोठी चूक केली आणि नको ते लोक निवडून गेले, अशी कबुलीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.