चिटफंड घोटाळा करणारा सतीश गावंडला चार दिवसांची पोलिस कोठडी.

By Raigad Times    18-Oct-2023
Total Views |
uran
 
उरण । चिटफंड प्रकरणी दुसर्‍यांदा अटक केलेल्या सतीश गावंड याला 21 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहेे. त्याला दर आठवड्याला पोलिसांसमोर चौकशीला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयातून जामीन मिळवला होता.
 
मात्र जामीन मिळताच त्याने पोबारा केला होता. यामुळे पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करून पुन्हा त्याच्या शोधासाठी कंबर कसली होती. परंतु अडीच महिन्यांपासून तो फरार होता.अखेर मध्यप्रदेशमधून गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याला अटक केली आहे.
 
यापूर्वी त्याची सुमारे 70 कोटीची संपत्ती जप्त केली आहे. तर अशाच चिटफंडच्या दुसर्‍या गुन्ह्यात अटकेत असलेल्या सुप्रिया पाटीलची देखील सुमारे 80 कोटीच्या संपत्तीवर पोलिसांनी टाच आणली आहे. त्यात गावंडची देखील अधिक संपत्ती समोर आल्याने त्यावर देखील कायदेशीर जप्ती आणली जाणार आहे. चिटफंडच्या माध्यमातून दोघांनी सुमारे 400 कोटींचा अपहार केला आहे.