नवीदिल्ली । आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास उशीर करत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत. आम्हाला मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, अन्यथा आदेश जाहीर करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मंगळवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जयंत पाटील आणि सुनिल प्रभू यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली होती. कपिल सिब्बल यांनी 25 सप्टेंबरला कोर्टाने दिलेल्या आदेशाचा उल्लेख केला. अध्यक्ष काय करत आहेत हे तुम्ही पाहिलंय का? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आपली बाजू मांडली असल्याचं सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहेत. हा पोरखेळ नाही. आम्ही जर मे महिन्यात आदेश दिला आहे, तर लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे असं कोर्टाने म्हटलं. यावर राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मला मंगळवारपर्यंत वेळ द्या अशी विनंती केली.