आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबीकडून चौकशी सुरु

20 Jan 2023 14:47:07
Alibag 1
 
अलिबाग | शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची चौकशी करण्यात येत आहे. याआधी त्यांची एकदा चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा रायगड एसीबीसमोर राजन साळवी हे हजर झाले आहेत. एसीबीने मागितलेली माहिती आणि कागदपत्रे साळवी सादर करणार आहेत.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार संघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार राजन साळवी यांनी बेकायदा मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून एसीबी चौकशी करीत आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आ. साळवी हजर झाले. यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विकास पिंपळे, पिंट्या ठाकूर यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. शेकापचे पदाधिकारी प्रफुल्ल पाटील आणि दत्ता ढवळे यांनी त्यांचे स्वागत केले.
 
१४ डिसेंबर रोजी साळवी पहिल्यांदा एसीबी समोर हजर राहिले. त्यावेळी त्यांची साडेपाच तास चौकशी झाली. एसीबीला आवश्यक उर्वरित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी साळवी यांनी २० जानेवारीपर्यंतची मुदत मागितली होती. त्यानुसार ते आलिबाग येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहीले आहेत.
 
मी ठाकरे गटात आहे. त्यामुळे सरकार मला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून त्रास देत आहेत. माझे मतदार, जनता यांना राजन साळवी काय आहे हे माहीत आहे. माझ्या मालमत्ते बाबत असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी मी आज लाच लुचपत कार्यालयात आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे." 
Powered By Sangraha 9.0