सत्तेच्या चाव्या प्रशासनाकडे देणे लोकशाहीसाठी घातक; खा. सुनिल तटकरे यांचे मत

By Raigad Times    20-Jan-2023
Total Views |
 sunil tatkare
 
 
अलिबाग । निवडणूका टाळून जनविकासाच्या चाव्या प्रशासनाच्या हातात देणे लोकशाहीला घातक आणि तसेच घटनाबाह्या असल्याचे मत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याची तयारी आघाडी सरकारने केली होती. अचानक सरकार बदलल्यानंतर या सरकारकडून या निवडणूका का टाळल्या जात आहेत त्यांचाच ठावून असेही त्यांनी म्हटले आहे.
 
खा. सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी अलिबाग येेथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर निशाना साधला. एक वर्ष उलटूनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झालेल्या नाहीत. घटनेनुसार सत्ता कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होणे गरजेचे असते. अत्यंत आणिबाणी प्रसंगी सहा महिन्यासाठी प्रशासकामार्फत काम पाहीले जावू शकते मात्र सरसकट सत्तेच्या चाव्या प्रशासनाच्या हातात देणे नियमबाह्य आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचे खा. सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.
 
यावेळी त्यांनी पंतप्रधान सडक योजनेच्या कामांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. गेल्या तिन वर्षांत जिल्ह्यातील या योजनेतील सर्व कामे थांबवण्यात आली होती. ही काम मंजूर करण्यासाठी राज्यातील 35 खासदारांनी केंद्रीय मंत्री निरंजनादेवी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही कामे मंजूर करवून घेतल्याचे सांगितले. यावेळी ग्रामविकास राज्य मंत्री कपील पाटील हेदेखील उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील अलिबागसह 11 तालुक्यांत पंतप्रधान सडक योजनेतील 61 किलोमिटरचे रस्ते मंजूर झाले आहेत. यासाठी 48 कोटी 62 लाख रुपये मंजूर झाले असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. हि कामे खांसदारांनी केलेल्या शिफारीसीनंतर मंजूर करण्यात आली आहेत. 1 फेबु्रवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुन्हा उर्वरीत कामांची मांगणी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मुंबई-गोवा महामार्ग, पाली रोड, अलिबाग-मुरुड आणि अलिबाग रोहा रस्त्याच्या कामांबाबत पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केलेे. तसेच मेडीकल कॉलेजच्या कामाला होणारा विलंब, तसेच आरसीएफ कंपनीच्या जनसुनावनीबाबतही प्रश्न पत्रकारांनी खा. तटकर यांना विचारले. यावर, आरसीएफची जनसुनावणी वेळेत झाली नाही तर तो प्रकल्प गुजरातला जाईल असे संबधीत मंत्र्यांने आपल्या सांगिल्याचे त्यांनी सांगितले.
 
स्थानिक आणि पीएपींचा प्रश्न हाताळतानाच प्रकल्प जाणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. तशा सुचना मी केल्या असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. रस्ते रखडलेत हे खरे आहे परंतू, मोठे रस्ते बहुतांशी पुर्ण होत आले आहेत. येत्या काळात हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. अलिबाग येथील मेडीकल कॉलेजचे कामही कुठल्याही परिस्थितीत थांबणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
मेडीकल कॉलेजची एक बॅच शिकून पुढे सरकली आहे. त्यामुळे कॉलेजचे काम लवकरात लवकर पुर्ण होणे गरजेचे आहे. मेडीकल कॉलेज सुरु झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात डॉक्टर मिळतील. तसेच स्थानिक गावांमध्येही विकासात्मक बदल घडतील असे खा. तटकरे म्हणाले. राजकिय विषयांवरही पत्रकारांनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी तेदेखील कुणावरही थेट न बोलता निसटून गेले.
 
यावेळी राष्ट्रवादीचे नेते चारुहास मगर, अमित नाईक, रुशिकांत भगत, आशिष भट, वाडगावच्या सरपंच सरिता भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.