272 पदांसाठी 19 हजार 176 अर्ज दाखल: 22 जानेवारी पर्यंत चालणार पोलीस भरती
अलिबाग । रायगड जिल्ह्यात 272 पोलीस पदांसाठी 19 हजार 176 अर्ज दाखल झाले आहेत. ही भरती 3 जानेवारीपासून रायगड पोलीस मैदान येथे पार पडणार आहे. तब्बल 18 दिवस ही भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे. अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती होणार असून कुठल्याही प्रकारे गैरव्यव्हार होणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पोलीस भरतीच्या पार्श्वभुमिवर आज (2 जानेवारी) रायगड पोलीसांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. अलिबाग येथे आजपोलीस भरती बंदोबस्ताची रंगीत तालीम पार पडली.
पोलीस शिपाई 272 पदे व चालक पोलीस शिपाई 6 पदांसाठी ही भरती होणार आहे. पोलीस शिपाई पदाकरीता 15 हजार 949 पुरुष, तर 3 हजार 227 महिला असे एकुण 19 हजार 176 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर चालक पोलीस शिपाई या पदाकरीता 647 अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस भरती बंदोबस्ताकरीता 53 पोलीस अधिकारी, 367 पोलीस अंमलदार व 27 मंत्रालयीन कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आलेले आहे.
कोणत्याही व्यक्तीकडुन ओळखीचे, आमिष दाखवून, पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस अधिक्षक कार्यालय, दुरध्वनी क्रमांक या 02141-228473, 222028 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
पोेलीस भरतीची अशी आहे तयारी ....
यावेळी उमेदवारांची बायोमॉट्रिक पडताळणी होणार आहे, संपूर्ण मैदान सीसीटीव्हीच्या निगराणीखाली, प्रत्येक इव्हेंटवर व्हिडिओ रेकोडिंग, प्रत्येक इव्हेंटसाठी अधिकारी इन्चार्ज असणार आहेत, उमेदवारांची राहण्याची व्यवस्था क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ, अलिबाग येथे निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे.