सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने गंडा; पावणेदोन लाखांचे दागिने घेऊन भामटे पसार

By Raigad Times    19-Jan-2023
Total Views |
fraud_gold Fraud 
 
महाड शहरातील घटना; गुन्हा दाखल
महाड । सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेला पावणेदोन लाखांचा गंडा घातल्याची घटना महाड शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बुधवारी, 18 जानेवारी रोजी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महाड शहरातील दस्तुरी नाका येथील सायली कॉम्प्लेक्समध्ये राहणार्‍या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
 
तक्रारदार महिला घरी असताना दोन अज्ञात इसम त्यांच्या घरी आले. त्यांनी या महिलेला सोन्याचे दागिने पॅालिश करुन देतो, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून या महिलेने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्या दोघांना काढून दिले.
 
दिलेल्या दागिन्यांना लाल रंग लावून या भामट्यांनी ते कागदावर ठेवले आणि महिलेला हळद आणण्यास सांगितली. ती महिला हळद आणायला आत गेली असता, हीच संधी साधत दोघेही भामटे पावणेदोन लाखांचे दागिने घेऊन पळ काढला.
 
महिला हळद घेऊन परतली, तेव्हा दोघेही दागिने घेऊन पसार झाल्याचे पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी महाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
याप्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करीत आहेत.