खालापूर : गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास 25 लाखांचा धनादेश प्रदान

19 Jan 2023 17:13:07
Raigad Police
 
मुंबई । खालापूर पोलीस ठाण्यांतर्गत दरोडा प्रतिबंधक पथकात कर्तव्यावर कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर 5 सप्टेंबर 2022 रोजी रात्री दीड वाजता अपघात झाला होता. या अपघातात त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व प्राप्त झाले. त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 25 लाख रुपये रकमेचा धनादेश गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
गृहरक्षक दलाच्या जवानांना विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रातील 46 हजार 334 जवानांचे बचत खाते उघडून त्यांना विमा संरक्षण व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आखाडे यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याने मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना मदतीचा धनादेश अनुज्ञेय झाला.
 
सदरचा धनादेश लक्ष्मण आखाडे यांना सुपूर्द करतेवेळी अपर पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक अतुल उत्तमराव झेंडे, एचडीएफसी बँकेचे संदीप कोचर, क्लेम सेटलमेंट व्यवस्थापक मंजरी सावंत आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0