मुंबई-गोवा हायवेवर रायगडजवळ भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू

By Raigad Times    19-Jan-2023
Total Views |
Mumbai-Goa Accident
 
मुंबई | मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात  झाला असून अपघातात  नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात चार वर्षीय बालक बचावला आहे. रायगड  जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली  होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनं  बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.
 
रायगडमधील माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणार्‍या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांचे शवं माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, या अपघातात चार वर्षांचा चिमुकला बचावल्याची माहिती मिळत आहे.
खोळंबलेली वाहतूक पूर्ववत
 
पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करुन वाहतूक सुरळीत केली. तसेच, अपघातात दगावलेल्या व्यक्ती नेमक्या कुठच्या होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
 
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्येही भीषण अपघात झाला. आरामबस पलटून चार जणांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली इथे वागदे पुलानजीक खाजगी बसला पहाचे चार वाजता भीषण अपघात झाला.