रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा वायशेतच्या तीन विद्यार्थ्यांची भरारी...

17 Jan 2023 16:35:25
Alibag
 
अलिबाग | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन २०२३ साठी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील वायशेत शाळेतील तीन विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन २०२३ आयोजित करण्यात आले आहे. अतिशय प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या मिशनसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा मंगळवारी (ता.१७) सत्कार केला. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच या विद्यार्थ्यांना मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचा शब्द‌ दिला.
 
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी तमिळनाडूतील पत्तीपुरम येथून १५० पिको सँटेलाईट हे परत वापरल्या जाणाऱ्या रॉकेट सह प्रक्षेपित होणार आहे. सदरचे रॉकेट उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने परत जमिनीवर उतरणार आहे. हे रॉकेट पुन्हा पुढील मिशनसाठी वापरता येईल असा प्रयोग सर्व प्रथम अमेरिकेमध्ये करण्यात आला होता. संपूर्ण जगात विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० पिको सटेलाईट आणि परत वापरले जाणारे रॉकेटसह प्रक्षेपण असा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग आहे. त्यामुळे या प्रकल्पाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे प्रशस्तीपत्र दिले जातील. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास पिको उपग्रह आणि रॉकेट बनविण्यासंबंधित १० दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. उपग्रह बनविण्यासाठी पुणे, नागपूर आणि परभणी येथे विद्यार्थ्यांची कार्यशाळा लवकरच आयोजित केली जाणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेऊन मेरीट मध्ये येणारे १०० विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनवतील.
 
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन २०२३ साठी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील वायशेत शाळेतील मोनिका संदीप बाबर (सहावी), बबिता नंदकुमार चव्हाण (सहावी), करण गणेश जाधव (सातवी) तीन विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे. या विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, गटशिक्षण अधिकारी कृष्णा रामा पिंगळा, केंद्रप्रमुख संतोष गावंड, मुख्याध्यापक श्रद्धा पाडगे, शिक्षक संदिप वारगे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0