रायगड जिल्हा बँकेकडून लघु उद्योगांना २० कोटींचे कर्जवाटप

By Raigad Times    16-Jan-2023
Total Views |
Raigad Zilha Madhyavarti Bank
रेवदंडा | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १००० पेक्षा अधिक लघुउद्योगांना सुमारे २० कोटीपेक्षा अधिक कर्जवितरण केलेले आहे. विशेष म्हणजे बँकेने हे काम केवळ तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेले आहे.
 
सप्टेंबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी याबाबत रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक लघूद्योगांना आणि विशेषत: शेती आधारित उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचा बँकेचा उद्देश असणार हे स्पष्ट केले होते.
 
त्याप्रमाणे बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने लघुउद्योगांना तत्काळ कर्ज उपलब्ध होईल याबाबत योजना बनविली आणि जिल्ह्याच्या प्रत्येक शाखेत ही योजना सुरू केली. रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत किमान १ लाख ते कमाल ५ लाखपर्यंत वैयक्तिक कर्ज बँकेकडून घेतले. शिवाय या कर्जदारांना बँकेने नुकतेच सुरू केलेल्या कयू आर कोडचे वाटप सुद्धा केले.
 
बँकेने या कर्जवाटपामध्ये दुग्धव्यवसाय, किराणा मालाचे दुकान, गणपती मूर्ती तयार करणे, आंबा लागवड, टुरिझम व्यवसाय, मासेमारी, ब्युटीपार्लर यासह अनेक उद्योगांना बँकेने कर्जपुरवठा केला आहे. बँकेच्या या योजनेमध्ये लोकांचा वाढता उत्साह पाहून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी समाधान व्यक्त केला आहे.