वर्षातील पहिल्या अंगारक संकष्टी चतुर्थीला पालीत लाखो भाविक भक्तगणांची गर्दी

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा, व्यापार व्यवसायाला मिळाली मोठी उभारी

By Raigad Times    10-Jan-2023
Total Views |
Pali2
 
पाली//बेणसे | नववर्षातील पहिल्या अंगारक संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (दि.१०) अष्टविनायकांपैकी एक प्रख्यात तीर्थक्षेत्र व आय एस ओ मानांकन प्राप्त म्हणून मान मिळवलेल्या पाली नगरीत भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. पहाटे पासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. या निमित्ताने व्यापार व्यवसायाला देखील मोठी उभारी मिळाल्याचे दिसून येतोय. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी अनेकांनी पायी वारी करीत मंदिर गाठले व दर्शन घेतले. दर्शनानंतर भाविकांच्या चेहर्‍यावर आगळेवेगळे समाधान पहायला मिळत होते.
रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती.

Pali 1 
 
भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले आहेत. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ होती. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेत्या महिला विक्री करत आहेत. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून हा रानमेवा खरेदी करतांना दिसले. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा सुद्धा चांगला झाला. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
 
Pali3
 
वाहतूक कोंडी
खाजगी वाहने, डंपर, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यांमूळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यावेळी वाहतूक पोलीस व भाविकांमध्ये हुज्जत देखील झाली.
 
वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात असुन देखिल अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. मात्र त्यांना सर्वच ठिकाणची कोंडी सोडवणे शक्य होत नाही.

Pali5
 
------------------------------------------------------ 
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक मंदिरात येत असतात, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्ट नेहमी सज्ज असते. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर लावले आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग, मांडव व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. प्रसादालय खुले आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
-जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
 --------------------------------------------------------------------------
नववर्ष व सलग लागून येत असलेल्या सुट्ट्या व वर्षातील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. भाविकांची वर्दळ असल्याने व्यवसाय देखील चांगला होत आहे.
-मनोज मोरे, व्यावसाईक, बल्लाळेश्वर देवस्थान