जेलीफिशमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात व्यवसाय २५% वर

08 Sep 2022 11:13:57
jeallyfish1
 
 
कोर्लई | वातावरणातील बदलामुळे, समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे मासे मिळणे अवघड झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अचानक मान्सून सक्रिय झाल्याने त्यातच समुद्रात विषारी जेली फिश माशांची संख्या बळावली असल्याने मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रकिनारी नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. आधीच मत्स्यदुष्काळ असताना, बोटी किनारी नांगरण्याची वेळ मच्छिमारांवर आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नदेखील यामुळे ऐरणीवर आला आहे.
 
 
दिवसेंदिवस समुद्रात प्रदूषण वाढत आहे. अशा वाढत्या प्रदूषणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे समुद्रात मासे मिळणे अवघड झाले आहे. तरी ही मच्छिमार बांधव हे आपला जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी जात आहेत. परंतु, सध्या जेली फिश मासे समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. साधारणपणे १०० ग्रॅम ते १० किलो इतके या जेली फिशचे वजन असल्याचे मच्छीमार सांगतात. या माशाला जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अनेकदा जाळे फाटत असून, आमचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
 
 
हे मासे जाळ्यात अडकल्यावर मासेमारी करणार्या खलाशांना डंक मारत आहेत. अंगावर खाज सुटते, लाल रंगाचे चट्टे उठून गाठी, जखमा निर्माण होतात. त्यात वैद्यकीय उपचार योग्य वेळी न मिळाल्यास खलाशी, कोळी बांधव दगावण्याचा संभव असतो. या भीतीमुळे मच्छिमार बांधवांनी बोटी किनारी नांगरुन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समस्यांच्या जाळ्यात अडकलेल्या या मच्छिमारांचे वास्तव बंदरात उभ्या या असलेल्या बोटीतून समोर येते.
 
 
सध्या समुद्रात मासे मिळतच नाहीत थोडीफार कोळंबी मिळत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात व ५ कि वजनाचे किंबहुना त्याहून अधिक वजनाचे जेली फिश मिळत असल्याने मासेमारी धोक्यात आली आहे. साधा खर्चही सुटत नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0