केळंबादेवीचा महिमा दानपेटीची चोरी करणारा चोर गजाआड ; LCB ची धडाकेबाज कारवाई

By Raigad Times    25-Sep-2022
Total Views |
aai
 
पेण | पेण तालुक्यातील खरोशी गावाच्या डोंगरावर असलेल्या जागृत अश्या केळंबादेवीच्या मंदिरात चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने दानपेटीची चोरी केल्याची घटना घडली होती. सदर चोर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. परंतु पेण पोलिसांच्या हाताला चोर काही लागत नव्हता, मात्र जागृत व स्वयंभू असलेल्या केळंबादेवीचा महिमा अफाट असल्याने आणि  कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दानपेटीची चोरी करणार्‍या सराईत चोरास ताब्यात घेत अटक करण्यात आली. सदर चोर खैरासवाडी येथील जावई असून एका राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे.
 
घटनेची सविस्तर माहिती अशी की, गेल्या चार दिवसांपूर्वी स्वयंभू व जागृत म्हणून ओळख असलेल्या व आई एकविरा देवीची बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील खरोशी गावातील डोंगरावर विराजमान झालेल्या केळंबादेवीच्या मंदिरातील स्टीलची दानपेटी काही अज्ञात व्यक्तीने चोरली असल्याची घटना घडली होती. नवरात्र उत्सव जवळ आल्याने व आपली श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने गावकार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. यादरम्यान मंदिराशेजारी असलेल्या डोंगरावरील वाढलेला गवत व पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पेण पोलिसांना व पेणच्या डीबी पथकाला चोरा पर्यंत पोहचण्यात व तपासात अपयश येत होते. त्यांनी काही संशयित चोरांना पकडून चौकशीअंती सोडूनही दिले होते. अनेक दिवस मंदिरातील चोरीचा तपास लागत नव्हता.

devi2
 
मात्र रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात सध्या कार्यरत असलेले व पेण तालुक्यातील यापूर्वीचा अनुभव असलेले पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी तपासाची सूत्र आपल्या हातात घेऊन डोंगरदर्‍यांमध्ये तपासाचा वेग वाढवून खारपाडा गावच्या हद्दीच्या डोंगरावर असलेल्या खैरासवाडी आदिवासीवाडीतून गुरुनाथ तुकाराम वाघमारे वय 47 या सराईत चोरास ताब्यात घेतले व पोलिसीखाक्या वापरून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल करत यापूर्वी सुद्धा दादर सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खारपाडा गावातील स्वयंभू शिवाई देवीच्या मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले.
 
दोन्ही घटनेचा समांतर तपास करत सदर गुन्हेगाराकडून चोरी केलेले 5905 रुपये रोख रक्कम, स्टीलची दानपेटी, पूजेचे तांब्याचे ताट व तांब्या ही सर्व मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून चोरीत वापरलेले लोखंडी टिकाव व पहार ताब्यात घेण्यात आली आहे. गुन्हेगारावर भादवी कलम 457, 380, 379, 461 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलीस नाईक जाधव, खराटे हे अधिक तपास करीत आहेत.
 
मंदिरातील चोर त्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता
 
स्वयंभू व जागृत खरोशी येथील केळंबादेवी आणि खारपाडा येथील शिवाई देवीच्या मंदिरात दानपेटी व इतर साहित्याची चोरी करणारा सराईत चोर हा एका पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची बोंबाबोंब सध्या विरोधकांकडून केली जात आहे. सदर चोर कार्यकर्ता त्या पक्षाच्या नेत्याच्या खांद्याला खांदा लावून अनेक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी असायचा. चोराला सोडण्यासाठी त्या रात्री सदर नेत्यांकडून पोलीस स्टेशनला फोनावर फोन करून शर्तीचे प्रयत्न ही करण्यात आले होते. मात्र ते जागृत देवीच्या महिमापुढे निष्फळ ठरले.