छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढवून दाखवा; मंत्री दादा भुसे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

By Raigad Times    23-Sep-2022
Total Views |
dada bhuse
 
अलिबाग । बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असून त्यांचं नाव वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे. बाळासाहेबांचा छायाचित्र लावू नका म्हणणार्‍यांनी हिम्मत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून काढून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
 
बंदरे आणि खानिकर्म मंत्री असणार्‍या दादा भुसे हे गुरुवारी अलिबाग येथे होते. येथे दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी ते आले असताना त्यानी हे आव्हान केले आहे.
 
 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीच्या मैदानामध्ये घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘बाप चोरणारी टोळी’ असा उल्लेख केला. यापूर्वीही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता निवडणुका लढण्याचं आव्हानही केलं आहे.
 
या टीकेला आता शिंदे गटातील आमदार आणि शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असून त्यांचं नाव वापरण्याचा अधिकार सर्वांना असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच बाळासाहेब हे सर्वांना पित्यासारखेच आहेत, असंही दादा भुसेंनी म्हटलं. इतकचं नाही तर बाळासाहेबांचा फोटो न वापरण्याच्या आव्हानाला उत्तर देताना दादा भुसे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनाच प्रतिआव्हान केलं.
 
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सर्व शिवसैनिकांना पित्यासमान आहेत. बाळासाहेब हे शिवसैनिकांना बापासारखे आहेत. सरकारने तसा कायदेशीररित्या शासन आदेश काढून राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे ते आम्हा सर्वांच्या पित्यासमान आहेत, असं दादा भुसे उद्धव ठाकरेंच्या टीकेसंदर्भात म्हणाले.
 
पुढे बोलताना भुसे यांनी थेट माजी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. देशाचे पिता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे. मी बोलू इच्छित नाही, पण जर फोटो काढण्याचीच गोष्ट असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जाऊ मग जनताजनार्दन त्याचा योग्य तो निर्णय करेल, असं भुसे यांनी म्हटलं. यावेळी आ. भरत गोगावले, आ.महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, प्रवकत्या शितल म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.