झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अलिबाग येथील शेकडो तरुणांना करोडोचा चुना; सायबर पोलिसांकडे तरुणांची तक्रार

By Raigad Times    23-Sep-2022
Total Views |
crime
 
 अलिबाग । आठवड्यात पैसे दुप्पट मिळण्याचे आमिष दाखवून कंपनीने अलिबाग तालुक्यातील शेकडो तरुणांना करोडोचा चुना लावला आहे. त्यामुळे या तरुणावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे फसवणूक झालेल्या तरुणांनी धाव घेतली आहे.नेसद्याक इंडिया ही फेक चायनीज कंपनी होती. कंपनीने चायनीज पोंझी स्कीम ऍपद्वारे बाजारात आणली होती. एक, दोन, चार, आठवड्यात दुप्पट पैसे देणार अशी ही योजना होती. आपले पैसे दुप्पट होणार या हव्यासापोटी शेकडो तरुणांनी या योजनेत पैसे भरले होते. गेली सहा महिन्यापासून अलिबाग तालुक्यात या योजनेचा धुमाकूळ सुरू होता. कंपनीने आधी भरलेल्या पैशावर दुप्पट पैसे देऊन ग्राहकांना आकर्षित केले होते. त्यामुळे ज्या ग्राहकाचे पैसे दुप्पट झाले त्यांनी साखळी पद्धतीने इतरांना योजनेत सामील करून घेतले.
 
कंपनीने ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जाळ्यात ओढले. अनेक ग्राहकांनी हजारो रुपयापासून लाखो रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली होती. कंपनी मार्फत रोज ग्राहकाला गुंतवणूक योजनेची माहिती व्हॉट्सऍप वर येत होती. त्यानुसार ग्राहक हा कंपनीच्या वॉलेट खात्यात पैसे भरत होता. मात्र कंपनीने ग्राहकांना वाढीव पैशाचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा चुना करून ऍप बंद केले. त्यामुळे शेकडो तरुण हे चायनीज योजनेत पैसे गुंतवणूक करून फसले गेले आहेत.फसलेले तरुण हे कंपनी च्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कंपनीने आपला हेतू सार्थ करून पसार झाली आहे.
 
त्यामुळे फसलेल्या तरुणांना आता सायबर पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन गुंतवणूक करणार्‍या योजना ह्या फसव्या असून अशा योजनेत पैसे टाकू नका असे वारंवार पोलीस जनजागृती करीत आहेत. मात्र झटपट पैशाच्या हव्यासापोटी ग्राहकच स्वतःला फसवून घेत असल्याच्या घटना घडतच आहेत.