महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी चेन्नईत मुलाखती का?; शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना संतप्त सवाल

By Raigad Times    21-Sep-2022
Total Views |
AT
 
मुंबई  | मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणार्‍या मविआ सरकारला पाडून आलेल्या या सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
 
आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून नोकरीसाठी लोक येतात. कालपरवा माझ्या माहितीत एक धक्कादायक प्रकार आला आहे. वर्सोवा बांद्रा सी लिंकची कंपनी बदलल्यानंतर दुसर्‍या कंपनीकडे याचे काम देण्यात आले. या नवीन कंपनीने नोकरीसाठी जाहिरात काढली आहे. मात्र, याच्या मुखाखती चेन्नईत होत आहेत. हा प्रकल्प आपल्या राज्यात होणार आहे. मग आपल्या राज्यातल्या मुलांना नोकरीची संधी का दिली जात नाही. बाहेर राज्यात का मुलाखती घेतल्या जातात , असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 
या नोकर्‍यांसाठी महाराष्ट्रात कुठेही जाहिराती नाहीत. त्यामुळे एमएसआरडीसीच्या खात्यात इतका गंभीर प्रकार होत असताना मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. दोन आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी एमटीएचएलची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच याचे 80 टक्के काम पूर्ण झाले होते. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. मला आनंद या गोष्टीचा आहे की जी कामं उद्धव ठाकरेंनी सुरू केली, ती काम आता 60 टक्क्यांच्यावर पूर्ण झाली आहेत. त्याची पाहणी आता सुरू आहे. त्यामुळे 40 गद्दारांना आमचं काम दिसत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे