मोकाट जनावरांना वेसन घालणार कोण ? नागरिकांचा ,वाहनचालक, पादचार्‍यांचा, विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात

By Raigad Times    21-Sep-2022
Total Views |
animals1
 
मुरुड | मोकाट जनावरांना वेसन घालणार कोण ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. सर्वत्र फिरणार्‍या या मोकाट जनावरांमुळे वाहनचालक व पादचारी यांना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शहरात फिरणार्‍या मोकाट जनावरांकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत असा नागरीकांचा आरोप आहे. तसेच मुरुड तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांवर जनावरांचा कायम ठिय्या असतो त्यामुळे वाहन चालकांना या गुरांमधून वाट काढताना नाके नऊ होत आहे. तसेच पादचार्‍यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून जावे लागत आहे.
 
मुरुड शहरात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मोकाट जनावरे फिरत आहेत व अनेक रस्त्यांवर, भरचौकात बिनधास्त वावरत आहेत. या मोकाट जनावरांमुळे शहरी भागात बाजारपेठेत स्थानिक नागरिक मोटारसायकल चालक बाजारहाट करण्यासाठी जाताना जिव मुठीत धरून जात आहेत. कधी एखाध जनावर येऊन मोटारसायकलला असलेल्या भाजिपाला, कडधान्य यांचा फडशा पाडेल याचा काही नेम नसतो अशा घटना शहरात अनेकवेळा घडत आहेत त्यामुळे नागरीकांचे शेकडो रुपयांचे नुकसान वारंवार होत आहे. ही जनावरे घरात घुसून अन्नधान्याची नासाडी करुन नागरिकांचे नुकसान करत आहेत. या मोकाट जनावरांचा स्थानिक प्रशासनाने बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

animals2 
 
मुरुड जंजिरा हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे समोर आले आहे. त्यामुळे देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या येणार्‍या पर्यटकांना सुध्दा रस्त्यावर बसलेल्या जनावरांमधुन जिवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुरुडच्या तिन्ही वेशिवर ही जनावरे जणुकाही येणार्‍या जाणार्‍यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असतात. या जनावरांना आवर घातला पाहिजे, वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरी स्थानिक प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करुन मोकाट फिरणार्‍या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.