जेएनपीए बंदरात तब्बल 1725 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई

21 Sep 2022 17:03:11
Raigad
 
उरण  | रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तब्बल 1725 कोटींचं 22 टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.
 
एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. उरणमधील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सदरचा कंटेनर हा एक वर्षांपासून असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या दोघांनी अनेक खुलासे केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी 1200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले असल्याचे समजते. त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता, मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचं समोर आलं होतं. दोन दिवसांपूर्वी रक्तचंदनाचा मोठा साठा पकडण्यात आला होता. त्यानंतर लगेच ही मोठी कारवाई झाली आहे. यामुळेच जेएनपीए हे तस्करांचा प्रमुख अड्डा बनला असल्याचे दिसत आहे.
 
याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचं विशेष पथक दोन्ही आरोपींना घेऊन जेएनपीए बंदरात दाखल झाले आणि कारवाई करत तब्बल 22 टन हेरॉइन जप्त केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. याची किंमत एकूण 1800 कोटी आहे.अंमली पदार्थांचा कंटेनर हा 21 जून 2021 ला जेएनपीटी बंदरात आला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत हा कंटेनर ताब्यात घेतला आहे. कोणत्याच सुरक्षा यंत्रणांना आतापर्यंत याबाबत माहिती नव्हती असं दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
 
दिल्ली पोलिसांनी आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा अंमली पदार्थांचा साठा जेएनपीए बंदरात पकडला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरातील कोणत्या यार्डमध्ये अंमली पदार्थांचा साठा पकडला याची माहिती स्थानिक प्रशासनाला ही माहिती नाही. त्यामुळे सदर अंमली पदार्थांचा साठा नक्की कुठे सापडला आहे, याची माहिती गुलदस्त्यातच असल्याचे दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0