एमजीएम दंत महाविद्यालयात रॅगिंग ; चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

By Raigad Times    11-Sep-2022
Total Views |
ragging
 
 
पनवेल | कामोठे येथील एम. जी. एम. दंत महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील चार विद्याथ्र्यांनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर कमिटीने, रॅगिंग करणार्‍या चार विद्यार्थ्यांविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
 
या तक्रारीनुसार पोलिसांनी या चार विद्यार्थ्यां विरोधात महाराष्ट्र छळवाद प्रतिबंध अधिनियम १९९४ (४) नुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात रॅगिंग झालेला विद्यार्थी महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहतो. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या चार विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये या विद्यार्थ्याचे रॅगिंग केले होते. या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या या विद्यार्थ्याने पालकांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याच्या आईने महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार केली. तसेच, माझ्या मुलास पॅनिक अटॅक येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
 
 
या कमिटीने रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करून त्याच्याकडून रॅगिंगसंदर्भात माहिती घेतली होती. त्यानंतर रॅगिंग करणार्‍या दोन्ही विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसमोर चौकशी केली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याचे आढळून आले. तसेच त्यावेळी त्या खोलीत असणार्‍या इतर दोन विद्यार्थ्यांचादेखील या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आले. यानंतर या महाविद्यालयाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.