जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत १ लाख ७४ हजार शेतकर्‍यांचा लॅन्ड डेटा अपडेट

11 Sep 2022 10:59:26
Raigad3
 
 
अलिबाग  | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात १ लाख ७४ हजार २१६ शेतकर्‍यांचा समावेश झाला असून, यासंदर्भातील लॅन्ड डेटा ऑनलाईन अपलोड करण्याचे तसेच ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करण्याचे काम पुर्ण झाले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता जिल्हा प्रशासनातील या अधिकारी-कर्मचार्‍यांनी हे काम अल्पावधीतच पूर्ण केले.
 
 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दि.९ सप्टेंबर २०२२ रोजी पर्यंत रायगड जिल्ह्यात लॅन्ड डेटा अपलोड झालेल्या नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या: १ लाख ७४ हजार २१६, एकूण आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- १ लाख ३६ हजार १५५, प्रमाणीकरणानंतर स्वीकृत झालेल्या एकूण अभिलेख्यांची संख्या: १ लाख ४९ हजार ४७६, प्रमाणीकरण झाल्यानंतर स्वीकृत झालेल्या शेतकर्‍यांची संख्या:- १ लाख ५ हजार ३७३ अशी आहे.
 
 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ९ सप्टेंबर २०२२ रोजी पर्यंत रायगड जिल्ह्यात ई-केवायसी कार्यवाहीत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकर्‍यांची संख्या- १ लाख ३६ हजार १५५, ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या: १ लाख १२ हजार ९७६ (८२.९८%) यापैकी कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत ७५ हजार ९५७ (५५.७९%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप २३ हजार १७९ (१७.०२%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे बाकी आहे. तर ३१ हजार ७११ (२३.२९%) लाभार्थी अपात्र ठरले आहे.
 
 
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या कालावधीत २ हजार रुपये दिले जातात. त्यानुसार वर्षाला एकूण ६ हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने काही नियम-अटी ठरवून दिल्या आहेत. त्यानुषंगाने प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍याची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले व यासाठी दि.७ सप्टेंबर २०२२ ही अंतिम तारीख घोषित करण्यात आली होती.
 
 
या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम करून लाभार्थी शेतकर्‍यांचा डेटा एकत्रित करून तो ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यवाही काही दिवसांतच यशस्वीरित्या पार पाडली.
 
 
ही माहिती केली संकलित:- जमिनीचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक, डाटा क्रमांक, खात्याचा प्रकार, फेरफारचा प्रकार अशा प्रकारची माहिती जमा करून ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0