अलिबाग | रायगड जिल्ह्यातील पाहिले आयपीएस अधिकारी होण्याचा बहुमान पटकावणार्या प्रतिक जूईकर याचे वडील चंद्रशेखर जुईकर यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रतिक जुईकर यांचा या यशाबद्दल सत्कार करताना शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक जुईकर यांना एक लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचीच वचनपूर्ती म्हणून सदर धनादेश आज शेतकरी भवन येथे सुपूर्द करण्यात आला.
प्रतिक जुईकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत, मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. ते देशात १७७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. याचबरोबर ते रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस होण्याचा मानही प्रतिक जुईकर यांनी मिळवला होता.
त्यांच्या या यशाबद्दल आ जयंत पाटील यांनी प्रतिक जुईकर यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी प्रतिक यांच्या कामगिरीबद्दल तसेच त्यांच्या पुढील शिक्षणात मदतीसाठी एक लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
प्रतिक चंद्रशेखर जुईकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारे आहेत. कर्जत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचे ते सुपूत्र आहेत.