गणपतीच्या मुहूर्तावर विराट कोहली झाला अलिबागकर; झिराडजवळ 8 एकरवर उभारणार फार्महाऊस

01 Sep 2022 16:33:25
virat kohali and anushka
 
 
अलिबाग । भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही 8 एकर हवेशीर जागा असून येथे तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (30 ऑगस्ट) पूर्ण केला.
 
 सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराट कोहली यास अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. सध्या तो आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्यामुळे गणपतीचा आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत लहान भाऊ विकास कोहली याने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे विराट कोहलीसाठी व्यवहार पूर्ण केला.
 
8 एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत केली. या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये असून यासाठी त्याने 3 लाख 35 हजार रेडीरेकनरनुसार 1 कोटी 15 लाख 45 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली. मंगळवारी विकास कोहलीने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. हा व्यवहार रियल इस्टेटमधील नावाजलेल्या समिरा हॅबिटॅट्स या कंपनीने केला.
 
या व्यवहारानंतर रवी शास्त्री, रोहीत शर्मा यांच्या पाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे. उद्योजक, सिने कलाकारांबरोबरच क्रिकेटपटूंनाही अलिबागच्या निसर्गरम्य परिसराची भूरळ पडत आहे. रवी शास्त्री याने दहा वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधले आहे, तर म्हात्रोळी-सारळ परिसरात रोहीत शर्मा याच्या 3 एकरमधील फार्महाऊसचे काम चालू असल्याची माहिती या फार्महाऊसचे बांधकाम करणारे अमित नाईक यांनी दिली.
 
याव्यतिरिक्त हार्दीक पंड्या, युजवेंदर चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते. यावरुन क्रिकेट, सिनेकलाकार, उद्योजकांची अलिबागला असणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0