पाण्यासाठी शेकापक्ष आक्रमक ; ऐन गणपतीत २६ गावे पाण्यापासून वंचित

पाणी न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

By Raigad Times    01-Sep-2022
Total Views |
MIDC
 
 
अलिबाग | हर घर जलचा नारा देशभरात दिला जात असताना अलिबाग तालुक्यातील तब्बल २१ गावे ऐन गणेशोत्सवात पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना तात्काळ पाणी पुरवठा सुरु करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भुमीका घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात धडक दिली. शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यावेळी पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ पाणी उपलब्ध करुन दिले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला.
 
 
अलिबाग तालुक्यातील चेंढरे, वेश्‍वी, कुरुळ, बेलकडे, आक्षी, ढवर, कावीर, बामणगाव, खानाव या दहा ग्रामपंचायत हद्दीतील चेंढरे, वेश्‍वी, गोंधळपाडा, कुरुळ, बेलकडे, ढवर, नवेदर बेली, सहाण, सहाणगोठी, सहाण आदीवासीवाडी, सहाण ठाकूरवाडी, कावीर, गरुडपाडा, बोरपाडा, खारीकपाडा, तळ, बामणगाव, कुंठयाची गोठी, वढाव खुर्द, वढाव बुद्रूक या २१ गावांना एमआयडीसीच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अपुर्या पाणीपुरवठयामुळे या गावातील हजारो ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
 
 
एमआयडीसीच्या अधिकार्यांना याबाबत शेकाप तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी वारंवार मागणी करुन देखील पाणी पुरवठयाबाबत एमआयडीसी अकार्यक्षम ठरत आहे. ३१ ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु झाल्यानंतरही गावांना पाणी पुरवठाच होत नसल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला. आपल्या संतप्त भावना ग्रामस्थ आणि पदाधिकार्यांनी शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्याकानावर घालताच तात्काळ पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी शिष्टमंडळामार्फत एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकार्यांकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी शिष्टमंडळाने एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्याकडे पुर्वनियोजित वेळेनुसार भेट घेत पाण्याची समस्या कानावर घातली. मात्र संजय ननवरे यांनी समस्या समजावून घेण्याऐवजी शिष्टमंडळालाच सदर पाणी गेल कंपनीचे असल्याचे उद्दामपणे सांगितले. हे उत्तर ऐकताच शेकापचे शिष्टमंडळ संतप्त होत आक्रमक झाले. कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांची चांगलीच कान उघाडणी करीत त्यांना चांगल्याच शब्दात समज देण्यात आली.
 
 
MIDC2
 
त्यावर आपली चुक लक्षात येताच कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी शेकाप शिष्टमंडळासमोर दिलगीरी व्यक्त करीत नमते घेत तात्काळ अडचणी दुर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.मात्र सदर पाणी आमच्या हक्काचे असून जर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह बेलकडे सरपंच संजय पाटील, कुरुळच्या उपसरपंच स्वाती पाटील, अवधुत पाटील, नरेश चवरकर, बामणगाव उपसरपंच लंकेश नागावकर, महेंद्र पाटील, रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
 
 
चेंढरेपासून वढावपर्यंतच्या सर्वच गावांमध्ये गेले वर्षभर पाण्याची मोठी समस्या आहे. एमआयडीसीच्या चुकीच्या धोरणामुळे या गावातील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कित्येक वेळा सांगून देखील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आज १० ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी अधिकार्यांनी आम्हाला चुकीच्या प्रकारे उत्तरे दिली. यावेळी आम्ही त्यांना इशारा दिला आहे की, संध्याकाळपर्यंत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर उग्र आंदोलन छेडून शेकापची ताकद दाखवून देऊ.
संजय पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्य
 
MIDC3
 
हर घर जलचा नार्याला हरताळ
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हर घर जलचा नारा देत संपूर्ण देशात प्रत्येक घराघरात पाणी पुरवण्याची घोषणा करुन या अभियानाची देशव्यापी मोहिम सुरु केली आहे. मात्र अलिबाग तालुक्यात एमआयडीसी मार्फत हजारो घरांमध्ये पाणी पुरवले जात नसल्याने घरात पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे ऐन सणासुदीत विकत पाणी आणण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या हर घर जल या नार्याला अकार्यक्षम अधिकार्यांमुळे हरताळ फासला जात असल्याचे निदर्शनास आले.