उरण-खारकोपर लोकल मार्च 2023 पर्यंत रुळावर

08 Aug 2022 18:10:52
uran
 
उरण | मध्य रेल्वेवरील बहुप्रतिक्षित नेरुळ-बेलापूर-उरण लोकल कॉरिडोरवर प्रवास करणार्‍या प्रवाशांना आणखीन काही महिने वाट पहावी लागणार आहे. खारकोपर-उरण पर्यंत लोकल ट्रॅक प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने ठेवले होते. परंतु सिडको प्रशासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध न झाल्यामुळे या प्रकल्पाला उशीर होत आहे.
 
 
खारकोपर-उरण लोकल कॉरिडोरचे 75% अधिक काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, जीएम अनिलकुमार लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली या चौथ्या कॉरिडोरचे काम वेगाने सुरू आहे. परंतु सिडकोकडून त्यांच्या वाट्याचा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे कामांवर परिणाम पडत आहे. जर त्यांनी वेळेवर निधी पुरवला तर या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत मार्च 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
 
 
या प्रकल्पाचा 67% वाटा सिडकोचा असून 33% रेल्वेचा आहे. सिडको भूसंपादनानंतर काम वेगाने सुरू झाले आहे. उरणपर्यंत टेकडी परिसर असल्यामुळे काम करणे कठीण जात आहे. न्हावाशेवा बंदराला थेट लोकल जोडणार नेरुळ आणि खारकोपर-उरण हा एकूण 27 किमीचा दुहेरी मार्गाचा रेल्वे कॉरिडोर आहे. 12.40 किमीचा पहिला टप्पा 11 नोव्हेंबर 2018 रोजीच उघडण्यात आला आहे. खारकोपर-उरण पर्यंतच्या 14.69 किमी मार्गावर काम सुरू आहे.
 
 
मुबंई ते उरण आणि न्हावा शेवा बंदर थेट लोकलला जोडण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार आहे. या मार्गावर पनवेल-जासई-जेएनपीए क्रॉसिंग लाईनही आहे. चौथ्या कॉरिडोरवर 10 स्थानके मध्य रेल्वेच्या या चौथ्या कॉरिडोरवर एकूण 10 स्थानके आहेत. त्यामध्ये नेरुळ ते खारकोपर लोकल धावत आहे. पुढील काम गव्हाण, रांजणपाडा, नवीन शेवा, द्रोणागिरी आणि उरण स्थानकांवर सुरू आहे. भुयारी मार्ग, पूल, उरणमधील पुलावर गर्डर टाकून खाली उतरविण्याचे कामे सुरू आहेत. खारकोपर-उरण विभागात 5 स्थानके, 2 मोठे पूल, 46 छोटे पूल, 4 पुलाखालील पूल आणि 4 ओव्हर ब्रीज बांधले जात आहेत.
 
 
सिडको मार्फत निधी मिळण्यास विलंब होत असल्याने प्रकल्पाच्या कामांवर परिणाम होत आहे.
Powered By Sangraha 9.0