पेणचे 'स्वातंत्र्य सैनिक स्मारक' अतिक्रमणाच्या विळख्यात

स्वातंत्र्य दिनापूर्वी मोकळा करण्याची पेणकरांची मागणी

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
pen
पेण | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या समोर असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले पेण शहरातील स्मारक एखाद्या अडगळी प्रमाणे दुर्लक्षित झाला असुन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या स्मारकासमोरील सर्व दुकाने तसेच वाहने तातडीने हलविण्यात यावीत अशी मागणी पेणकरांनी पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे केली आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी हे स्मारक मोकळा श्वास घेणार का? असा सवालही आता पेण शहरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
 
पेण तालुक्याचे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात फार मोठे योगदान होते. तालुक्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ शहरातील महत्मा गांधी वाचनालया समोर आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही वर्षांपूर्वी जुने स्मारक बांधले आहे. या स्मारकावर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांची आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची गावासहीत नावे कोरलेली आहेत.
 
हे पेण तालुक्यातील नागरिकांसाठी भूषणावह आहे. मात्र सध्यस्थितीला पाहिले तर या ठिकाणची अवस्था दयनीय झाली आहे, आणि या स्मारकाजवळील परिसर देखील अस्वच्छ असतो. एवढेच नव्हे तर दिवसा ढवळ्या या ठिकाणी अनेक प्रकारच्या गाड्या हात गाड्या उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे हे स्मारक सहसा कुणाला दिसत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधुन या स्मारका जवळील परिसर स्वच्छ करून, येथील उभ्या असणाऱ्या टपऱ्या, हात गाड्या हटवून या स्मारकाला मोकळा श्वास घेण्याजोगी कार्यवाही करावी, अशी मागणी पेणकरांनी पेण नगरपालिकेकडे केले आहे.
 
"केंद्र शासनाकडून घरोघरी "हर घर झेंडा" हा उपक्रम राबविण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्या उपक्रमाला देशभरातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मी पेण पालिकेकडे अशी मागणी करत आहे की शहरातील महात्मा गांधी वाचनालया समोर असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाजवळही अतिक्रमण हटवून देशाचा तिरंगा फडकवावा, जेणेकरून या स्वातंत्र्य सैनिकांची भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी तरी आठवणी जाग्या होतील."
-हरिष बेकावडे, स्थानिक रहिवासी, पेण शहर